ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जेव्हा मेहमूदचा आत्मविश्वास हरवला तेव्हा जॉनी वॉकरनी त्याला सांगितलं…
हास्य अभिनेता मेहमूद (Mehmood) चित्रपटात येण्यापूर्वी सिनेमातील वातावरणाशी परिचित होता कारण त्याचे वडील मुमताज अली सिनेइंडस्ट्रीत बऱ्याच वर्षांपासून कार्यरत होते. मेहमूद देखील बालकलाकार म्हणून सिनेमात झळकला होता. पुढे अशोक कुमार, पी एल संतोषी यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून बरेच वर्षे काम करत होता.
या काळात ऋषिकेश मुखर्जी यांनी टोबॅको कंपनीच्या एका ॲड फिल्ममध्ये मेहमूदला संधी दिली. त्याची ही जाहिरात बघून महेश कौल यांनी १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ या चित्रपटात मेहमूदला घेतले. त्यापूर्वी देव आनंदच्या राज खोसला दिग्दर्शित ‘सीआयडी’ या चित्रपटात मेहमूदने छोटी भूमिका केली होती.
आता मात्र महेश कौल यांनी ‘अभिमान’ या चित्रपटात त्याला मोठी भूमिका ऑफर केली होती. ‘अभिमान’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या सीनच्या वेळी मेहमूद प्रचंड घाबरला होता, नर्व्हस होता कारण महेश कौल हे अतिशय कडक शिस्तीचे दिग्दर्शक होते. त्यांना कामातील हलगर्जीपणा अजिबात चालत नसे. प्रसंगी ते सर्वांच्या समक्ष त्या कलाकाराचा अपमान करायला देखील घाबरत नसत. (Untold story of Mehmood)
महेश कौल यांची ही कीर्ती ऐकून मेहमूद त्या दिवशी खूपच अपसेट होता. पहिल्या सीनमध्ये त्याला किचन मधून चहाचा ट्रे घेऊन यायचं होतं आणि चहा सर्व्ह करताना एक डायलॉग म्हणायचा होता. तसं म्हटलं तर, अगदी सोपा शॉट होता. पण मनातून घाबरल्यामुळे मेहमूद वारंवार चुकत होता. कधी वाक्य विसरत होता, कधी चहा सांडत होता, कधी दुसरीकडेच बघत होता, तर कधी चालण्याचा वेग आणि कॅमेरा यांचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे शूटिंग पुढे सरकत नव्हतं.
मेहमूद सोबतचे सहकलाकार देखील वैतागले होते. प्रत्येक चुकलेल्या शॉट गणिक महेश कौल यांच्या रागाचा पारा चढत होता. शेवटी कळस झाला त्यांनी मेहमूदला प्रचंड झापले आणि प्रॉडक्शन टीमला म्हणाले, “ह्या पोराला इथे कोणी आणले? याला या सिनेमातून काढून टाका.”
हाती आलेली सोन्यासारखी संधी निघून जात आहे, हे पाहून मेहमूद खूपच दु:खी झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. संध्याकाळी तो त्याचा गुरु जॉनी वॉकर यांच्याकडे गेला. जॉनी वॉकरच्या सांगण्यावरूनच मेहमूदला गुरुदत्तनी ‘सीआयडी’ चित्रपटात छोटीशी भूमिका दिली होती. (Untold story of Mehmood & Johnny Walker)
जॉनी वॉकरने मेहमूदची सगळी करुण कहाणी ऐकून घेतली आणि ते त्याला म्हणाले, “आज तुझ्या शूटिंगचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी प्रत्येकाला असाच अनुभव येत असतो. मला देखील असाच अनुभव आला होता. मी काय किंवा तू काय, पण देव आनंद , दिलीप कुमार, राज कपूर यांना देखील असेच अनुभव आलेले आहेत. जो चुकीतून शिकतो तोच पुढे जातो. त्यामुळे उद्या पहिल्यांदा स्टुडीओत जाऊन महेश कौल यांची माफी माग आणि त्यांना, ‘मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही करेन, मला समजून घ्या’, अशी विनंती कर. पहिल्याच दिवशी अशी शस्त्र टाकू नकोस अजून मोठी लढाई घडलेली पुढेच आहे.”
============
हे ही वाचा: सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण…
कार चालवायला शिकवणाऱ्या आपल्या गुरुला मुक्ताने दिली होती ‘अशी’ गुरुदक्षिणा
============
गुरु जॉनी वॉकरचा सल्ला ऐकून मेहमूद मनोमन सुखावला. त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. ‘असा अपमान प्रत्येकाचाच होत असतो. या अपमानाला घाबरायचे नसते उलट यातून शिकायचे असते, हा नवा मंत्र त्याला त्यातून मिळाला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच तो स्टुडिओमध्ये गेला आणि महेश कौल यांना नमस्कार करून त्याने आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराची माफी मागितली, तसंच यापुढे मी माझ्या अभिनयात सुधारणा करेन असे वचन दिले. महेश कौल यांनी देखील मोठ्या मनाने मेहमूदला माफ केले आणि त्याला शूटिंगसाठी उभे केले. मेहमूदच्या अभिनयाची यात्रा इथून जी सुसाट सुरू झाली ती पुढची वीस वर्ष जबरदस्त चालली. इतकी सुसाट की, मोठ्या मोठ्या नायकांना देखील मेहमूदच्या अस्तित्वाची भीती वाटू लागली होती.