जुन्या काळातील अष्टपैलू अभिनेत्री… उषा किरण!
प्रत्येक काळात सिनेमाची काही वैशिष्ट्ये असतात आणि त्यानुसार अनेक कलाकारही असतात. पन्नास आणि साठच्या दशकातील मराठी चित्रपट म्हणजे, प्रामुख्याने कौटुंबिक आणि दुसरीकडे पौराणिक चित्रपट. त्या काळातील एक हुकमी अभिनेत्री म्हणजे उषा किरण (जन्म. २२ एप्रिल १९२९ वसई येथे. तर निधन ९ मार्च २०००). ज्या पिढीने “शिकलेली बायको” (१९५९) आणि “कन्यादान” (१९६०) हे चित्रपट अतिशय आवडीने पाहिले त्यांना उषा किरण यांच्या अभिनय शैलीची निश्चित कल्पना असेलच.
उषाकिरण (Usha Kiran) यांचे खरे नाव उषा मराठे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषाकिरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. वयाच्या बाराव्या वर्षी उषाकिरण यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना “कुबेर” या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. पण आपली नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना बरेच काही देणारी ठरली. ती फार महत्वाची असते. नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या जडणघडणीवरचे लक्ष आपल्याच पत्थ्यावर पडेल याची त्यांना खूपच लवकर कल्पना आली. नृत्य शिकण्यासाठी त्या काळातील प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या नृत्य अकादमीत त्या सहभागी झाल्या आणि त्यांनी अभिजात नृत्य कला आत्मसात केली.
चित्रपट क्षेत्रात कारकिर्द साकारताना नृत्य येणे हा अतिशय महत्वाचा घटक आहे याची कल्पना अशी खूपच अगोदरच्या काळातील अभिनेत्रींमध्ये होती आणि त्यात विशेष तथ्यही आहे. त्याच वेळी त्यांनी हिंदी, बंगाली, इंग्रजी, तमिळ आणि गुजराती या भाषा शिकून घेतल्या. नंतर उषा किरण यांना ’सीता स्वयंवर’ हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती. पण ’मायाबाजार’ मध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली.
मंगल पिक्चर्सचा ‘जशास तसे’ आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित ‘क्रांतीवीर वासुदेव बळवंत’ यांत केलेल्या भूमिकांमुळे उषाकिरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. कलाकाराचा आत्मविश्वास वाढण्यासाठी हे फार आवश्यक असते. यश हे एक प्रकारचे टाॅनिकच ठरत असते. एकीकडे नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची प्रवृत्ती आणि त्याच वेळी त्यांचा बोलका चेहरा, नृत्यातील प्रगती आणि या सगळ्यातून आलेला आत्मविश्वास यामुळे त्या काही वर्षातच हिंदीतही झेपावल्या. मराठी चित्रपटातून मराठी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत जाणे नवीन नाही हे असे केव्हापासूनच आहे याची आपणास कल्पना आली असेलच. १९५० मध्ये ‘श्रीकृष्ण दर्शन’ मध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषाकिरण असे केले.
हे देखील वाचा: सुलोचना दिदी मराठीतील एक सोज्वळ चेहरा म्हणून आपल्या समोर आहेत.त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांनी ही ओळख कायम ठेवली आहे
पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या त्या अगदी रसिकांची पिढी ओलांडूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. उषाकिरण यांनी ‘जशास तसे’ मध्ये डोंबारीण आणि ‘पुनवेची रात’ मध्ये तमासगिरीण तर ‘बाळा जो जो रे’मध्ये ‘सोशिक स्त्री’ अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या. यातील ‘जशास तसे’ या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. मराठीत फार पूर्वीपासूनच उत्तमोत्तम थीमवर चित्रपट निर्माण होत आहेत आणि त्याद्वारेच उषा किरण यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकारांनी मराठी चित्रपट रुजवला. ते दर्जेदार असतात याचा प्रेक्षकांना विश्वास दिला. माधव शिंदेंच्या ‘शिकलेली बायको’ आणि ‘कन्यादान’मध्ये त्यांच्यातले अष्टपैलू अभिनय सामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली.
उषा किरण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले नसते तर नवलच होते. अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘पतिता’मध्ये (१९५३) देव आनंदसोबत, तसेच ’दाग’ मध्ये (१९५२) दिलीपकुमारसोबत, तसेच ’काबुलीवाला’मध्ये बलराज साहनी तर ’नजराना’मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. यातील ‘पतिता’ या चित्रपटातील याद किया दिल ने कहा हो तुम, किसने अपना बनाके मुझको ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा मान त्यांना मिळाला याचा विशेष उल्लेख हवाच.
याच वाटचालीत त्यांनी १९५४ साली डाॅ. मनोहर खेर यांच्याही विवाह केला. आणि ‘सप्तपदी’ (१९६४) या मराठी चित्रपटानंतर नायिका म्हणून अभिनय करणे थांबवले. पण या गुणी अभिनेत्रीने सत्तरच्या दशकात खास दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहाखातर त्यांच्या बावर्ची, मिली, चुपके चुपके या चित्रपटात चरित्र भूमिका साकारल्या. एव्हाना चित्रपट निर्मितीची पध्दत बदलली होती आणि रसिकांचीही पुढची पिढी आली होती. अशातच निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री सुषमा शिरोमणीने ‘फटाकडी’ (१९७९) या चित्रपटात भूमिका दिली. पण पुन्हा चित्रपटसृष्टीत रमण्याऐवजी त्यांनी सामाजिक कार्यात रस घेतला. आपल्या या एकूणच वाटचालीवर त्यांनी ‘उषःकाल’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यात जुन्या काळातील चित्रपटसृष्टीचे आणि कलाकारांच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडते. उषा किरण यांची कन्या तन्वी हिने आईचा अभिनयाचा वारसा पुढे सुरु ठेवला.
उषाकिरण यांचे ९ मार्च २००० रोजी निधन झाले. जुन्या काळातील एक आघाडीच्या अभिनेत्री म्हणून उषा किरण कायमच लक्षात राहतील हे निश्चित.