‘सिनेमा चोरीला जातो’ म्हणजे नक्की काय…?
‘गुलाबो सिताबो’ कसा आहे असे स्वतः जाणून घेण्यापूर्वीच ‘ब्रेकिंग न्यूज’ आली, तो चोरट्या पावलांनी काही ॲपवर आला देखिल.
शूजित सिरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन व आयुष्यमान खुराना अभिनित हा चित्रपट सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात देशविदेशातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली असल्याने अमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने रिलीज झाला आणि त्याला समिक्षकांची दाद कशी मिळतेय, किती स्टार दिले गेले याची खबर येण्यापूर्वीच तो लिक व्हावा हे धक्कादायक आहे. एकाच वेळेस जगभरातील तब्बल दोनशे देशात त्याला सबक्राईब्स मिळाले आणि इतकेच नव्हे तर जगभरातील एकूण पंधरा भाषेच्या सबटायटल्सने तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या गतीला वेग आला ही यातील जमेची बाजू आहे. त्यात अरेबिक, रशियन, जर्मन, फ्रेन्च, पोलीश, कोरियन, ग्रीक, तुर्किश, इंग्रजी इत्यादी भाषा आहेत. हा कोणत्याही भारतीय भाषेतील चित्रपटाचा हा नवीन विक्रम आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हे खूपच मोठे पुढचं पाऊल आहे.
अर्थात, ॲप चोरीने त्याची प्रेक्षकसंख्या नक्कीच घटेल. आणि या नुकसानीची तशी काहीच अधिकृत आकडेवारी नसते.
पण ‘सिनेमा चोरीला जाणे’ ही गोष्ट अजिबात नवीन नाही असे मी म्हटल्याने तुमची उत्सुकता प्रचंड प्रमाणात ताणली गेली असेलच.
या चोरीचे प्रकार प्रत्येक काळात होते आणि ते भिन्न प्रकारचे होते.
अगदी मागील काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक चित्रपटाची प्रिंट काढली जाई आणि ती त्या त्या थिएटरवर पोहचली जाई. आमच्या गिरगावातील नाझ थिएटरमध्ये अनेक वितरकांची कार्यालये होती. तेथे गुरुवारपासून नवीन चित्रपटाच्या प्रिंट्स पाठवायची लगबग आणि घाई पाहायला मिळे. कारण शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होत असतो. पण कधी दुर्दैवाने प्रवासी ट्रेनने पाठवलेली प्रिंट नियोजित स्टेशनवर उतरवली नाही की ती पुढे जायची. आणि ‘पत्ता चुकल्यासारखी’ ती फिरत राहायची. कधी दूरवरच्या खेड्यातील थिएटरमध्ये पोहचून तेथे तो चित्रपट रिलीजही व्हायचा आणि इकडे वितरकाला त्याचा पत्ताच नसे. एक लक्षात घ्या, सत्तरच्या दशकच्या अखेरीपर्यंत घरी फोन असणे दुर्मिळ असे. सांगायचे तात्पर्य असे की, आजच्या ग्लोबल युगात आपण एका क्षणात जगभरात संपर्क साधू शकतो, तसे त्या काळात नव्हते. आणि अशी चोरी उघडकीस यायला बराच वेळ लागे.
निर्माता अजय सरपोतदार (आज तो हयात नाही) याने आपल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटाचा भन्नाट अनुभव मला सांगितला होता. पूर्वी ग्रामीण भागातील थिएटरवाले एका गावातील थिएटरसाठी मराठी चित्रपटाची प्रिंट घेऊन जात आणि दोन शोच्या दरम्यान बराच वेळ ठेवून इकडचे एक रिळ स्कूटरवरून तिकडच्या गावी असे हमखास करीत (हीदेखील सिनेमाची चोरीच), कधी दिवसा तीन शोसाठी प्रिंट नेत आणि पब्लिकचा रिस्पॉन्स वाढला की दुपारी बाराचा शोही सुरु करीत. सिनेमा हाऊस फुल्ल गर्दीत चालला तरी त्याला खास गर्दी नव्हती असे चक्क कागदोपत्री दाखवण्यात यशस्वी ठरत. तर एका गावात एस. टी.ने पाठवलेली प्रिंट बरेच दिवस झाले तरी आलीच नाही, म्हणून शोधाशोध सुरू झाली असता, काही आठवडे तो सिनेमा चालल्यावर ती प्रिंट परत पाठवल्याचे समजले. पण मग प्रिंट गेली कुठे? अस्वस्थ करणारी ही गोष्ट होती. खूप दिवसांनी समजले की, एका गावातील जत्रेत तंबू थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जातो आहे. गंमत म्हणजे याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी अजय सरपोतदारने आपणच आपल्या चित्रपटाचे तिकीट काढून खात्री केली. आणि मग त्याने स्थानिक पातळीवर प्रयत्न करुन आपल्या चित्रपटाची प्रिंट एकदाची परत मिळवली.
त्या काळात नाझ थिएटरखालच्या कॅन्टीनमध्ये एकाद्या वितरकाच्या ऑफिसमधील मित्राशी गप्पा रंगल्या तरी अशा ‘ प्रिंट चोरीच्या रंजक गोष्टी’ समजत.
आपल्या देशात १९८२ साली रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला आणि या चोरीची पध्दत बदलली. साहजिकच आहे, नवीन तंत्रज्ञानासह चोरीची पध्दतही नवीन येणारच. एखाद्या नवीन चित्रपटाच्या मिनी थिएटरमधील शोच्या वेळीच छुप्या कॅमेरात पडद्यावरचा अख्खा सिनेमा कॉपी होऊ लागला आणि आजच रिलीज झालेला चित्रपटाची आजच व्हीडीओ कॅसेट येऊ लागली. ते शक्य नसेल तर फस्ट डे फर्स्ट शोच्या वेळी हाच प्रकार व्हायचा. कधी नाझमधून उपनगरातील थिएटरकडे निघालेली प्रिंट मध्येच गायब होई आणि त्यावरून प्रिंट निघे. धर्मेंद्रने आपल्या निर्मिती संस्थेच्या वतीने ‘बेताब’ (१९८३) च्या वेळेस प्रत्येक प्रिंटवर कोड नंबर टाकला. त्यामुळे नेमकी कुठून व्हीडीओ चोरी झाली हे समजणे शक्य होईल ही खेळी होती. पण चित्रपट सुपर हिट झाला आणि या चित्रपटाच्या व्हीडीओ चोरीकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यातूनच एक नवीन विषय पुढे आला की, सिनेमाची चोरी झाली तरी त्याचा यशस्वी चित्रपटावर परिणाम होत नाही ना? मग जाऊ दे. म्हणजे, चोरी थांबवा याचा कोणी विचार करीत नव्हते अथवा ते गरजेचे वाटले नाही. १९८६ साली राज्यातील चित्रपटगृहे/शूटिंग/डबिंग वगैरे वगैरे सगळे बंद करण्यात आले. एक महिना संप चालला त्यात एक मागणी सिनेमाच्या व्हिडिओ चोरीवर आळा घाला हीदेखील होती. यावर तेव्हा भरपूर उलटसुलट चर्चा रंगली, पण चोरी थांबली नाही. म्हणून निर्माता आणि दिग्दर्शक विजय कोंडके यांनी आपल्या ‘माहेरची साडी’ (१९९१) च्या वेळेस प्रत्येक प्रिंटवर एक माणूस ठेवला. तो हा चित्रपट प्रदर्शित झालेल्या थिएटरवरुन या चित्रपटाची मधली दोन रिळे घरी घेऊन येई. म्हणजे थिएटरबाहेर अख्खी प्रिंट कोणी नेली आणि सिनेमा कॉपी झाला याची भीती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी हे आवर्जून केले आणि त्यामुळे तो सुपरड्युपर हिट चित्रपट ठरला. ‘हम आपके है कौन’ (१९९४) च्या वेळेस राजश्री प्रोडक्शनच्या वतीने खास विजय कोंडके यांच्या याच हुशारीच्या टीप्स घेतल्या आणि ते करताना सुरुवातीचे काही आठवडे मुंबईसारख्या अनेक मोठ्या शहरात फक्त आणि फक्त एकाच थिएटरमध्ये सिनेमा रिलीज केला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टी होते आणि त्यासह त्यांनी तिकीट दरही वाढवले. तेही चोरी रोखण्यात यशस्वी ठरले.
एव्हाना आपली चित्रपटसृष्टी आपला चित्रपट असा चोरीच्या मार्गाने व्हिडिओ कॅसेटवर येणार ही ‘रियलिटी’ स्वीकारत वाटचाल सुरु ठेवून होती. यावर दोन उपाय आले, एक म्हणजे, आपल्या चित्रपटाचे व्हिडिओचे अधिकार अधिकृतपणे विक्री करा, म्हणजेच त्याची काही हमी रक्कम मिळेल. एक प्रकारची ही टेरिटोरी झाली. त्यामुळे अधिकृत व्हिडिओ कॅसेटचा दर्जा चांगला असे तर ‘सिनेमा चोरीला गेलेल्या’ कॅसेटवर चरे पडलेले दिसत. आणि दुसरा मार्ग म्हणजे एव्हाना उपग्रह वाहिनीच्या आगमनाने घराघरात दूरचित्रवाणी संच पोहचला होता, त्यामुळे एखाद्या चॅनेलसाठी खूप लवकर नवीन चित्रपटाचे हक्क विका.
यावरचा एक वेगळा अनुभव सांगतो, एकदा यशराज फिल्मकडून यश चोप्रा यांच्या जुहूच्या बंगल्यावर या, यशजीना काही सिनेपत्रकारांशी बोलायचे आहे असे आमंत्रण माझ्या हाती आले आणि माझे कुतूहल जागे झाले. याचे कारण म्हणजे आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (१९९५)ची खणखणीत यशस्वी वाटचाल सुरु आहे आणि अशातच ही भेट कशासाठी याची उत्सुकता होती. प्रत्यक्षात यशजीनी आश्चर्याचा मोठा धक्काच दिला. त्यांनी आम्हा सिनेपत्रकाराना ‘डीडीएलजे’ ची पाकिस्तानमध्ये चोरटी व्हिडिओ कॅसेट विकली जात असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले. म्हणजे, सिनेमा चोरीला जातो याचा प्रवास कुठून कुठेही कसाही असू शकतो याचा अनुभव घेतला.
अगदी कालांतराने तर ‘आजच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची अगदी आजच’ मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चक्क स्वस्तात सीडी मिळू लागली. एव्हाना, असंख्य प्रेक्षकांत एक समज रुजला होता, सिनेमा थिएटर्स/मल्टीप्लेक्सच्या मोठ्या पडद्यावर पाहायला काय आणि काही इंचाच्या टीव्हीवर पाहायला काय असा काही फरक पडत नाही. ‘सिनेमा कसा पहावा’ या शिक्षणाची अजिबात गरज नसलेला प्रचंड मोठा वर्ग आपल्या समाजात आहे, त्यानेच खरं तर आपल्या देशात सिनेमा जगवलाय/वाढवलाय. आणि मल्टीप्लेक्सची महागडी जीवनशैली आणि तिकीटे परवडत नाहीत, त्यापेक्षा जास्त चांगला आहे तो ‘शॉर्टकट’! मोबाईल स्क्रीनवर सिनेमा आलाय तो जणू मुठीत आला आहे. कुठूनही कितीही पहावा, मध्येच सोडून द्यावा याचा आपणच आपला निर्णय घ्यायची मोठी सोय त्यामुळे झाली.
आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट रिलीजच्या युगात सिनेमा चोरीला जाऊन ॲप वर तो सहज उपलब्ध होऊ लागला आहे. म्हणजेच, सिनेमा चोरीला जाण्याची एक खूप खूप मोठी यशस्वी परंपरा पुढे सुरु आहे असेच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे… होय ना?….