
काय तर म्हणे, सैफ व कुणाल कपूरचा “ज्वेल थीफ”
नव्वदच्या दशकातील गोष्ट. सतत नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताची आमंत्रणे येण्याचे ते दिवस. एके दिवशी अशाच एका आमंत्रणावर चित्रपटाचे नाव वाचताना ठसका लागला, “राम और श्याम“. चित्रपटात माणिक बेदी, मोनिका बेदी आणि सम्राट यांच्या भूमिका. हा सांस्कृतिक धक्काच हो. ‘राम और श्याम’ म्हणेपर्यंत दुहेरी भूमिकेतील भिन्न स्वभावातील दिलीप कुमार डोळ्यासमोर दिसू लागतोच. तरीही त्याच नावाचा पुन्हा चित्रपट? पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमधील या चित्रपटाच्या मुहूर्ताला गेल्यावर समजले की, हे फक्त नाव घेतलेय (ते तरी कशाला हो घ्यायचे?) यात राम आणि श्याम हे दोघे वेगळे नायक आहेत. हा चित्रपट कधी बरे प्रदर्शित होवून गेला हे समजलेच नाही. बरं झालं. शिक्षा मिळाली.(jewel thief)

असेच एकदा जुहूच्या सांगली व्हीला या बंगल्यात मधुवंती पटवर्धन हिची मुलाखत घ्यायला गेलो तेव्हाही फार दचकलो होतो. (संगीतकार व दिग्दर्शक विजयसिंग पटवर्धन यांचा हा बंगला. भाग्यश्री त्यांची मुलगी आणि अर्थातच मधुवंती ही तिची बहिणी. नात्यात नाते ही तर चित्रपटसृष्टीची खुबी) ती बोलता बोलता म्हणाली, मी कीर्तिकुमार दिग्दर्शित ‘दो आंखे बारह हाथ‘ या चित्रपटात भूमिका करतेय… मला वाटलं, आपल्या ऐकण्यात काही चूक झाली म्हणून मी तिला पुन्हा विचारले, तरी तिने तेच नाव घेतले व म्हणाली, गोविंदा माझा हीरो आहे. आणि माझ्या डोळ्यासमोर चित्रपती व्ही. शांताराम यांची “दो आंखे बारह हाथ” ही महान कलात्मक कलाकृती आली. घट्ट नाते आहे हो हे.
आताही अगदी तसेच झालयं, ‘ज्वेल थीफ‘ (jewel thief) नावाचा चित्रपट पुन्हा एकदा बनतोय आणि बुडापेस्ट येथे त्याचे शूटिंग सुरु असल्याचे समजले नि फार दचकलो. राॅबी ग्रेवाल दिग्दर्शित या ‘ज्वेल थीफ’मध्ये सैफ अली खान व कुणाल कपूर यांच्या भूमिका आहेत? यात ‘हिरे चोर’ कोण आणि इंटरपोल पोलीस कोण हे समजून यायला वेळ लागेल. यात नायिका कोण आहे की नाही हेही अजून स्पष्ट नाही आणि आपण तरी त्याची चिंता का करा? ‘ज्वेल थीफ’ म्हटल्यावर विजय आनंदच्या कल्पक दिग्दर्शनात अशोक कुमार, देव आनंद, वैजयंतीमाला, तनुजा एव्हाना आठवले असतीलच.

१९६७ सालचा हा टेरिफिक चित्रपट. क्लायमॅक्सपर्यंत सस्पेन्स कायम हे या म्युझिकल सुपरहिट चित्रपटाचे वैशिष्ट्य. गाणी आजही लोकप्रिय. रुलाके गया सपना मेरा (गीतकार शैलेंद्र), यह दिल ना होता बेचारा, आसमा के नीचे, दिल पुकारे अभी ना जा मेरे साथी, होठों पे ऐसी बात, रात अकेली है (गीतकार मजरुह सुल्तानपुरी) आणि संगीतकार सचिन देव बर्मन. नवकेतन फिल्म बॅनरखालील चित्रपट म्हणजे दर्जेदार चित्रपट संगीत हे दीर्घकालीन लोकप्रिय काॅम्बिनेशन (देव आनंद दिग्दर्शनात पडल्यावर ती खासियत दुर्मिळ होत गेली तरी त्यांच्या पूर्वीच्या चित्रपटातील गीत संगीत सर्वकालीन लोकप्रिय आहेच.)
‘ज्वेल थीफ’ (jewel thief) व ‘विजय आनंद’ या एकाच नाण्याच्या दोन हुकमी बाजू. या चित्रपटाची कथा के. ए. नारायण यांची तर पटकथा, दिग्दर्शन व संकलन विजय आनंद यांचे. फर्स्ट रनला ज्युबिली हिट ठरलेला हा चित्रपट सत्तरच्या दशकात रिपीट रन व मॅटीनी शोला वारंवार आला आणि आम्ही विजय आनंद चाहते आणि देव आनंदभक्तांनी वारंवार पाहिला. मॅटीनी शो आणि म्युझिकल सस्पेन्स थ्रीलर चित्रपट हे हिट समीकरण. ते दिवसच वेगळे होते.

…. अशातच नव्वदच्याच दशकाच्या मध्यास असेच एक नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती आली. त्यावर नाव वाचले, “रिटर्न ऑफ ज्वेल थीफ“. चित्रपटाचे लेखन रणबीर पुष्प व संजय निरुपम यांचे. (संजय निरुपम मग राजकारणात गेला), तर निर्माते टी. पी. अग्रवाल, दिग्दर्शक अशोक त्यागी. या चित्रपटात अशोककुमार, देव आनंद (दोघेही ‘ज्वेल थीफ’मध्ये होतेच), धर्मेंद्र, जॅकी श्राॅफ, शिल्पा शिरोडकर, प्रेम चोप्रा, सदाशिव अमरापूरकर वगैरे वगैरे.
========
हे देखील वाचा : फिल्मी अड्ड्यावरील चर्चेतील फिल्म
========
अंधेरी पश्चिमेकडील आंबोलीतील फिल्मालय स्टुडिओत या ‘रिटर्न ऑफ…’च्या मुहूर्ताला पाऊल टाकताच समजले, आपल्या क्लासिक चित्रपटाचा असा पुढचा भाग (अर्थात सिक्वेल) येतोय हे मान्य नसल्याने (आणि यासाठी आपली परवानगी न घेतल्याने… गोल्डी आनंद अतिशय शिस्तबद्ध होता. ‘चालसे’ संस्कृती त्याला मंजूर नव्हतीच. ) त्याने मुहूर्ताला येणे टाळले.
फिल्मालय स्टुडिओतील एका मोठ्याच सेटवर बरेच दिवस ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’चे शूटिंग सुरु असतानाच एकदा जॅकी श्राॅफ तर एकदा शिल्पा शिरोडकरच्या मुलाखतीसाठी माझे जाणे झाले, अर्थात या प्रत्येक वेळी मनात गोल्डी अर्थात विजय आनंदचाच ‘ज्वेल थीफ’ सुरु होता. पिक्चरचा इम्पॅक्टच एकदम भारी होता आणि सैफ असो वा कुणाल आताही १९६७ चाच ओरिजनल ज्वेल थीफ आठवणार. मी सत्तरच्या मॅटीनी शोला व गल्ली चित्रपटात ‘ज्वेल थीफ‘ (jewel thief) एन्जाॅय केला. आजही पिढी यू ट्यूबवर तो एन्जाॅय करतील आणि म्हणतील, पूर्वी एकेक भारी पिक्चर्स बनायचे हो…