Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

चुपके चुपके: जय-वीरूची मॅड कॉमेडी
कोरोनासारख्या वैश्विक महामारीने घड्याळाच्या काट्यावर पळणाऱ्या आलम दुनियेला घरात बसून राहायला भाग पाडलं. बघता बघता कोरोनाने रौद्ररूप धारण केलं आणि जनमानसातील भयरसाची जागा करुणरसाने घेतली. समाजप्रिय माणूस कित्येक वर्षांनी चार भिंतींमध्ये बंदिस्त झाला होता. बाहेर कडक लॉकडाऊन, संभाव्य बेरोजगारी व महागाईची टांगती तलवार आणि झपाट्याने वाढणारे कोरोनाबाधितांचे आकडे मन विषण्ण करत होते. अश्यावेळी लोकांनी मन दुसरीकडे रमवण्यासाठी मनोरंजन क्षेत्राचा आधार घेतला. निरनिराळ्या तऱ्हेचे नवे-जुने चित्रपट, वेबसिरीज आणि शोज लोकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले. मनोरंजनातून वातावरणात निर्माण झालेला तणाव कमी करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला विनोद, विनोदी कलाकार आणि विनोदी कलाकृतींनी!
रामायण, महाभारतासारख्या जुन्या पौराणिक मालिका, हास्यरसाने ओतप्रोत भरलेल्या दर्जेदार कलाकृतींच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन रिझवू लागल्या. अंदाज अपना अपना, बॉम्बे टू गोवा, गोलमाल, हेराफेरी, इत्यादी चित्रपट पुन्हापुन्हा चवीने पाहिले जाऊ लागले. भारतीय ‘मिडल सिनेमाचे जनक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृषीकेश मुखर्जींचा ‘चुपके चुपके’ हा एक अप्रतिम सिनेमाही याच पठडीतला. १० एप्रिल १९७५ ला रिलीज झालेला हा सिनेमा त्यावर्षीच्या ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक मानला जातो.
‘चुपके चुपके’ (Chupke Chupke) ची कहाणी फिरते धर्मेंद्रने साकारलेल्या बॉटनी प्रोफेसर डॉ. परिमल त्रिपाठी या पात्राभोवती. बायको सुलेखाकडून (शर्मिला टागोर) तिच्या जिज्जाजींच्या (ओम प्रकाश) हुशारीचं भरमसाठ कौतुक ऐकून दुखावलेला परिमल स्वतःची हुशारी सिद्ध करायचं ठरवतो. सुलेखाच्या जिज्जाजींना म्हणजेच शहरातील नामांकित वकील असलेल्या राघवेंद्र शर्मांना परिमल कश्यारितीने चकवतो, हे पाहताना प्रेक्षकांची हसूनहसून पुरेवाट होते. धर्मेंद्र, ओम प्रकाश आणि शर्मिलासोबतच अमिताभ, जया, असरानी, डेव्हिड, उषा किरण, केश्तो मुखर्जी, लिली चक्रवर्ती इत्यादींनीही या चित्रपटात काही खास व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

बंगाली साहित्यिक उपेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या ‘छद्मबेशी’ कथेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती एन. सी. सिप्पी, रोमू सिप्पी आणि स्वतः हृषीकेश मुखर्जींनी केली होती. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी चित्रपटातील सर्वच गाण्यांना पुरेपूर न्याय दिला असून, लता मंगेशकर, मुकेश, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी या सुरेल गळ्यांनी त्यांना योग्य साथ दिलेली आहे. चला तर जाणून घेऊयात ‘चुपके चुपके’विषयी काही खास गोष्टी..
पौराणिक मालिकांइतका एकमेव लोकप्रिय सिनेमा
रामायण, महाभारतासारख्या पौराणिक मालिका जेव्हा टीव्हीवर लागायच्या, तेव्हा रस्त्यावर पूर्णतः शुकशुकाट असायचा. या मालिका बघण्याची वेळ चुकू नये यासाठी प्रेक्षक नानाविध तडजोडी करून मालिका चालू होण्यापूर्वी टीव्हीसमोर जाऊन बसायचे आणि मग घराबाहेर अघोषित कर्फ्यूच सुरु व्हायचा. हीच लोकप्रियता पुढे जाऊन ‘चुपके चुपके’ने मिळवली. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की १९८०मध्ये एका खास दिवशी सरकारच्या विशेष शिफारशीनुसार हा चित्रपट दूरदर्शनवर दाखवला गेला. त्या ‘खास’ दिवशी सूर्यग्रहण असल्याने लोकांनी घराबाहेर पडून उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये, यासाठी सरकारने ही खास शक्कल लढवली होती.
हृषीदांनी ओढवून घेतली आशा पारेखची नाराजी
‘गुड्डी’च्या चित्रिकरणादरम्यान हृषीदांना बंगाली कथा ‘छद्मबेशी’वर आधारित त्याच नावाचा चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. चित्रपट पाहिल्यावर त्यांनी या चित्रपटाचा रिमेक करण्याचानिर्णय घेतला आणि धर्मेद्रसोबत आशा पारेखला मुख्य भूमिकेत घेण्याचं ठरवलं. पण धर्मेंद्रने हृषीदांना आशा पारेखऐवजी शर्मिला टागोरला या चित्रपटात घेण्यासाठी राजी केलं. हृषीदांनी आपल्याऐवजी शर्मिलाला भूमिका दिल्याने आशा पारेख नाराज झाली. गंमतीचा भाग असा की, आपला रोल धर्मेंद्रमुळे गेला हे माहित असूनही त्याच्याशी आशाचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले मात्र तिने हृषीदांच्या चित्रपटांकडे पाठ फिरवली, ती कायमचीच!

अमिताभ-जयाने घेतलेच नाही मानधन
हृषीदा नवा चित्रपट बनवतायत हे कळल्यावर अमिताभ आणि जया बच्चन यांनी तडक हृषीदांना गाठलं आणि चित्रपटात रोल देण्याची विनंती केली. त्यावेळी हृषीदांना सुकुमार आणि वसुधाच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्यांची गरज होती. त्यांनी अमिताभ आणि जयाला या भूमिका कमी महत्त्वाच्या आणि लांबीच्या असल्याचं सांगून त्यांना नकार दिला. या नकाराला न जुमानता त्या दोघांनीही मानधन न घेता कुठलाही रोल करण्याची तयारी दर्शवली आणि त्यांच्या या हट्टापुढे हृषीदांना आपले हात टेकावेच लागले. हृषीदांनी त्या दोघांचीही सुकुमार आणि वसुधाच्या रोलसाठी निवड तर केलीच, पण चित्रिकरणादरम्यान गरोदर असतानाही जयाची कामाप्रति असलेली निष्ठा पाहून त्यांच्या भूमिकांमध्ये आवश्यक फेरबदल करून त्या भूमिकांना वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले.
धर्मेंद्र-अमिताभचा खऱ्या अर्थाने पहिला एकत्रित चित्रपट
१९७५मध्ये सगळ्यात जास्त बोलबाला होता तो ‘शोले’चा! धर्मेंद्र आणि अमिताभ या जोडगोळीचा हा तिसरा चित्रपट होता. मेहमूद दिग्दर्शित ‘कुँवारा बाप’मध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ पहिल्यांदा एकाच चित्रपटात सहकलाकार म्हणून काम करत होते. पण त्या चित्रपटात सहाय्यक व्यक्तिरेखा साकारत असल्याने एकमेकांसोबत एकही सीन त्या दोघांना करता आला नाही. त्यामुळे एकत्र स्क्रीन शेअर करण्याचा पहिला अनुभव त्यांना मिळाला तो हृषीदांच्या या ‘चुपके चुपके’मध्ये! ‘चुपके चुपके’नंतर पाचच महिन्यात रिलीज झालेल्या ‘शोले’मध्ये देमार फायटिंग करणाऱ्या जय-वीरूने या चित्रपटात मात्र आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाची हमी दिली.
=====
हे देखील वाचा: एका मराठी माणसाने धर्मेंद्रला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.
=====
कडक शिस्तीचे हृषीदा
कलाकारांना ते शूट करत असलेल्या सीनबद्दल पूर्वकल्पना न देणे हा हृषीदांचा अलिखित नियमच होता. आपल्या वाट्याला कोणता सीन येणार आहे याची कल्पनाही नसल्याने बऱ्याचदा सेटवर गोंधळ उडायचा आणि आगामी सीन कोणता असेल, यावरील चर्चांना उधाण यायचं. अश्या चर्चांमुळे त्रस्त झालेले हृषीदा ‘तुम्हाला काही माहित नाही म्हणून तुम्ही फक्त अभिनयच करू शकता आणि मी दिग्दर्शक आहे.’ अश्या स्पष्ट शब्दांत कलाकारांची कानउघडणी करत असत.

इतकंच नव्हे, तर धर्मेंद्रच्या सतत उशिरा येण्याच्या सवयीमुळे हृषीदांनी ‘सारेगामा’ या गाण्यामध्ये अमिताभलाही सामील करून घेतलं, जे आधी फक्त धर्मेंद्रवर चित्रित केलं जाणार होतं. अर्थात, धरम तो धरम है! हातचं एक गाणं जाऊनही त्याने आपली उशिरा यायची सवय मोडली नाहीच!
आपल्या ॲक्शन हिरोच्या साचेबद्ध भूमिकेतून बाहेर पडू पाहणारा धर्मेंद्र आणि बॉलीवूडमधील सर्वश्रेष्ठ चरित्र अभिनेत्यांपैकी एक असलेल्या ओम प्रकाश यांच्यातील विनोदी जुगलबंदी असो वा धर्मेंद्रने इंग्रजी भाषेची केलेली चिरफाड असो वा अमिताभने घातलेला कोरोला आणि करेलाचा घोळ, असे कित्येक प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. धर्मेंद्र फक्त मारधाडपटांसाठी बनला नसून त्याला विनोदाचीही उत्तम जाण असल्याचं सिद्ध करणारा हा चित्रपट आहे. आज या कल्ट कॉमेडीला ४६ वर्षे पूर्ण होत असून, चित्रपटातील सर्व पात्रे, गाणी आणि प्रसंगांना पडद्यावर जिवंत करणारा खास ‘हृषीदा’ टच आजही प्रेक्षकांचं तितकंच मनोरंजन करण्यात आणि त्यांना भरभरून हसवण्यात यशस्वी ठरला आहे.
=====
हे वाचलंत का: आपल्या अभिनयाने अनेकांना भुरळ घालणारी अभिनेत्री ते संसदेत परखड मतं मांडणाऱ्या खासदार जया बच्चन.
=====