Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Amitabh Bachchan ची “सेकंड इनिंग” जास्त प्रभावी
गुणवत्ता कायम असते, फाॅर्म कधी कधी जातोदेखील… गुणवत्ता कायमच साथ देते. (कदाचित नशीब साथ देणार नाही.)
अमिताभ बच्चनचंच (Amitabh Bachchan) बघा, “कौन बनेगा करोडपती“चं आज पंचवीसावे वर्ष तो पहिल्याच एपिसोडच्या (२००० साल) उत्साहाने खेळतोय, या पंचवीस वर्षांत (२००० ते २०२५) तो कधीच “आऊट ऑफ फाॅर्म” वाटलाच नाही आणि त्यातले एक सर्वोत्कृष्ट चित्रपट संजय लीला भन्साली दिग्दर्शित “ब्लॅक“. मुंबईत रिलीज ४ फेब्रुवारी २००५. वीस वर्ष पूर्ण झालीदेखील. कधी गेली हो इतकी वर्ष?

‘ब्लॅक’मधील त्याची व्यक्तिरेखा अगदीच वेगळी. एका वृद्ध मद्यपी शिक्षक देबराजची. त्याला अल्झायमर म्हणजे मेंदू हळूहळू अशक्त होत होत जावून स्मरणशक्ती कमजोर होते, काहीच आठवत नाही आणि वयाचा आणि वागण्याचा काहीच संबंध राहत नाही. त्याच्या आणि ॲग्लो इंडियन मुकी बहिरी अशी बेचाळीस वर्षांची मिशेल मॅकनली (रानी मुखर्जी) यांच्या नातेसंबंधाची सिमला येथील अतिशय बर्फाळ प्रदेशात घडलेली संवेदनशील भावपूर्ण गोष्ट. मिशेलच्या निवेदनातून चित्रपट आपल्या समोर येतो. एक अतिशय वेगळा आणि तरल असा अनुभव ही क्लासिक कलाकृती देतो. (या चित्रपटाला नवप्रवाहातील म्हणायचे का? का नाही?)
हेलेन केअरच्या १९०३ सालच्या “द स्टोरी ऑफ माय लाईफ” या साहित्यावर आधारित संजय लीला भन्सालीने कथारुप दिले, आणि मग संजय लीला भन्साली, भवानी अय्यर व प्रकाश कापडिया यांनी पटकथा लेखन केले. चित्रपट माध्यमातील ही सर्वात महत्वाची गोष्ट. “ब्लॅक”चे यश पटकथेत तसेच अभिनय, रवी के. चंद्रन यांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन सादरीकरणात आहे. चित्रपटाला समिक्षकांची आणि चोखंदळ रसिकांची दाद मिळाली.

अमिताभ बच्चनचे (Amitabh Bachchan) प्रगती पुस्तक म्हणजे एक अनेक भागांची वेबसिरीज. एक कलाकार, एक माणूस दीर्घकाळ इतके आणि असे बहुस्तरीय, भिन्न काम करीत अतिशय चांगला आदर्श ठेवून वाटचाल करतोय आणि त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट, त्याच्या कारकिर्दीतील “दुसरा डाव”. अर्थात सेकंड इनिंग.
पहिल्या डावात सुरुवातीच्या अडखळीत सुरुवातीनंतर आनंद, जंजीर, नमक हराम, दीवार या चित्रपटातील लक्षवेधक कारागिरीनंतर त्याने कधीच “मागे वळून पाहिलेच” नाही. तो सतत ‘उंच’च राहिला. त्यालाही चित्रपट फ्लाॅपचा अनुभव आला, अगदी सुरुवातीला दिग्दर्शक कुंदन कुमारने तो ‘अपयशी नायक’ असे मानतच “दुनिया का मेला” या चित्रपटातून त्याला काढून चक्क संजय खानला रेखाचा हीरो केले (गंमत म्हणजे ‘जंजीर’ने मुंबईत इंपिरियल चित्रपटगृहात पन्नास आठवड्यांचा खणखणीत सुपर हिट मुक्काम केल्यावर त्याच इंपिरियल चित्रपटगृहात १९७४ साली दुनिया का मेला प्रदर्शित झाला आणि पडला), अमिताभचेही जवळपास पन्नास चित्रपट निर्मितीच्या कोणत्या तरी टप्प्यावर बंद पडले (त्यातील शिनाख्त, रुद्र, बंधुआ, आलिशान, राम की गीता श्याम की सीता, देवा, रिश्ता या चित्रपटांच्या मुहूर्तांचा लाईव्ह अनुभव मी मिडियात असल्याने घेवू शकलो. काहींचे फोटो माझ्या कलेक्शनमध्ये आहेत).
‘कुली‘च्या बंगलोर येथील सेटवरील अपघात आणि मग मुंबईत ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल होणे. या जिवघेण्या आजारावर त्याने मात केली, ऐंशीच्या दशकात तर त्याने गाॅसिप्स मॅगझिनवरील राग म्हणून बराच काळ मिडियाशी चुप्पी घेतली होती, तो राजकारणात अपयशी ठरला, ‘खुदा गवाह’ पडद्यावर येताच काही काळ ‘थांबणे’ पसंत केले… अनेक गोष्टींसह त्याने प्रवास करताना सत्तर व ऐंशीच्या दशकातील आपली ॲन्ग्री यंग मॅन अर्थात सूडनायक ही प्रतिमा मागेच ठेवून नवीन शतकात नव्याने प्रवास केला. (Amitabh Bachchan)

सत्तरच्या दशकात समांतर चित्रपट अथवा नवप्रवाहातील चित्रपट आकार घेत असताना अमिताभने आपल्या गुणवत्ता व लोकप्रियतेचा त्या चित्रपटातील भूमिका स्वीकारत फायदा करुन द्यावा असे म्हटले जाई. पण अमिताभ त्या काळात मनमोहन देसाई, Yash chopra, ह्रषिकेश मुखर्जी, प्रकाश मेहरा, Ramesh sippi यांच्या चित्रपटात जास्त गुंतला होता. रवि टंडन, शक्ती सामंता, रमेश बहेल, एस. रामनाथन, राकेश कुमार, टीनू आनंद, वगैरे दिग्दर्शकांचीही नावे घेता येतील. गुलजार यांनी मात्र अमिताभला (व राजेश खन्नादेखिल) आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात का बरे संधी दिली नसावी? सुभाष घई दिग्दर्शित ‘देवा ‘त तोच शीर्षक भूमिकेत होता. पण चित्रपट बनला नाही. (Entertainment mix masala)
सेकंड इनिंगमधील अमिताभ (Amitabh Bachchan) पुढील पिढीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारत राहिल्यानेच बदललेला हिंदी चित्रपट, मल्टीप्लेक्स युगात चित्रपटात येत असलेले चाकोरीबाहेरचे विषय, नवीन पिढीतील दिग्दर्शकांची मानसिकता व दृष्टिकोन, चित्रपट माध्यमात आलेले नवीन तंत्र या सगळ्याशीच अमिताभ जोडला गेला. काळासोबत बदलणे म्हणजे काय असते हे अमिताभ बच्चनच्या सेकंड इनिंगमधून पडद्यावर दिसतेय. त्याला बीग बी म्हटले म्हणजेच त्याच्यात बदल झाला असे नव्हे. मुळात तो विलक्षण सामर्थ्यशाली अमिताभ बच्चन आहे, म्हणून तर सेकंड इनिंगमध्ये काय साॅलीड विविधता दिली आहे.
===========
हे देखील वाचा : Deewaar : “दीवार”चे डायलॉग ऐकायलाही रस्त्यावर गर्दी होई
===========
बघा, संजय लीला बन्सालीचा ब्लॅक, रामगोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार, सरकारराज, आर. बल्की दिग्दर्शित चीनी कम, पा, सुरजित सरकार दिग्दर्शित पिकू, अनिरुद्ध राॅय चौधरी दिग्दर्शित पिंक, सुजोय घोष दिग्दर्शित बदला, रुमी जाफरी दिग्दर्शित चेहरे, सुरजित सरकार दिग्दर्शित गुलाबो सिताबो…. नावे वाढतच चाललीत. केवढी विविधता आहे बघा.
माझ्या पिढीतील चित्रपट रसिक अमिताभच्या कभी कभी, अमर अकबर ॲन्थनी, त्रिशूल, लावारीस, मुकद्दर का सिकंदर, नमक हलाल, कुली, मर्द या चित्रपटांची आतुरतेने वाट पहाण्यात वाढली आणि आगाऊ तिकीट विक्रीच्या रांगेत उभे राहून चित्रपट एन्जाॅय केले. त्या काळात अमिताभ (Amitabh Bachchan) कडून मनोरंजनाची अपेक्षा असे. ती पूर्ण झाली नाही की त्याच्या चित्रपटाकडे पाठ फिरवली जाई. दो और दो पांच, इमान धरम, महान, पुकार वगैरे. अमिताभचा फ्लाॅप चित्रपट मिथुन चक्रवर्तीच्या हिट चित्रपटापेक्षा जास्त प्रेक्षक पाहत (कमाई करीत) यात एक प्रकारचा आनंद मिळे. आजच्या तरुण पिढीसमोर विविध रुपातील अमिताभ आहे.

व्यक्तिरेखा भिन्न, गेटअप वेगळा. चित्रपट माध्यमात म्हणा वा दृश्य माध्यमात अभिनय कसा करायचा, स्वत:ची जडणघडण कशी करायची याचा अमिताभ बच्चन एक प्रकारचे विद्यापीठच. ‘दीवार‘ला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात आयोजित केलेल्या खास खेळाला अमिताभची एन्ट्री, प्रभावी संवादफेक यांना तीन पिढ्यांच्या चित्रपट रसिकांनी हाऊसफुल्ल गर्दीने उत्फूर्त टाळ्या आणि शिट्ट्यांनी मनसोक्त मनमुराद रिस्पॉन्स दिलेला मी अनुभवला तर मग आणखीन काय हवे? खरे नाणे कोणत्याही काळात खरेच असते. दीवार ( १९७५) ते ब्लॅक ( २००५) आणि त्यात दीवारची पन्नाशी तर ब्लॅकची वीस वर्ष काय भन्नाट योग आहे हो… (Amitabh Bachchan)