
‘तारीख पे तारीख’ हा कायमच गुंतागुंतीचा प्रकार
राजेश खन्नाची डायरी दोन वर्षे फुल्ल आहे, त्याच्याकडे एकही तारीख शिल्लक नाही (Date Schedule). असे शालेय वयात मला रसरंग साप्ताहिकात वाचताना एकच समजत होते, तो एकाच वेळेस अनेक चित्रपटातून भूमिका साकारतोय म्हणून त्याच्याकडे सध्या वेळच नाही. राजेश खन्नाच्या फॅन्सना सुखावणारी अशीच ही गोष्ट.
पिक्चर बनवण्यातील एक महत्वाचा फंडा तारीख(Date Schedule). त्यातच त्या काळातील अनेक मसालेदार मनोरंजक चित्रपटात डायरी (तीही लाल रंगाच्या कव्हरची) जणू एक व्यक्तिरेखा असे. सलिम जावेद लिखित व चंद्रा बारोट दिग्दर्शित ‘डाॅन’ आठवला असेलच. एकाच वेळेस अनेकांची एकेक तारीख मिळवत हे मनोरंजन क्षेत्र कार्यरत आहे. हा सगळ्यात मोठा गुंतागुंतीचा असा अद्भुत आणि चमत्कारिक फंडा आहे. जावे त्यांच्या वंशा तेव्हाच ते कळे. एका स्टारच्या तारखा (Date Schedule) मिळवताना त्याच्यासोबतच्या स्टारच्याही तारखा हव्याच. त्या मिळवताना त्यानुसार स्टुडिओची तारीख, कला दिग्दर्शकाची तारीख, त्याला सेट लावण्यासाठी काही दिवस द्या, कॅमेरामनची तारीख, यांच्या टीमच्या तारखा वगैरे वगैरे असा बराच मोठा प्रवास असतो हो. पडद्यामागचा पिक्चरचा प्रवास खूपच वळणावळणाचा.(Date Schedule)

ज्या काळात संवाद संपर्काची फारशी माध्यमे नव्हती त्या काळात हा ‘तारखांचा खेळ मेळ'(Date Schedule) कसा घातला जाई? रमेश देव यांच्या मुलाखतीचे मला अनेक योग आले. एकदा कुतूहल म्हणून मी हाच प्रश्न त्यांना केला. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर तेव्हाच्या काळाचे सामाजिक आशय सांगणारे असेच होते. ते मला म्हणाले, जवळपास सत्तरच्या दशकापर्यंत पुणे अथवा कोल्हापूरातील मराठी चित्रपट निर्माता तिकडून पोस्ट पत्रावर कधीपासून किती दिवस शूटिंग आहे हे कळवत असे, अथवा कोणीतरी कोल्हापूरवरुन निर्मात्याची चिठ्ठी घेऊन मुंबईत येत असे. कधी खुद्द निर्माता व दिग्दर्शक येई. त्या तारखांनुसार पुणे अथवा कोल्हापूरला जाण्यायेण्याचे ठरे. थोडसं तारीख व मानधनाचे इकडेतिकडे होई. पण एकमेकांवरचा विश्वास, कामावरची निष्ठा आणि नवीन चित्रपट साईन केल्याचा आनंद अशा अनेक गोष्टींनी काम होत असे. कधी कोल्हापूरमध्ये एका मराठी चित्रपटाचे शूटिंग करत असतानाच आणखीन एकादा नवीन चित्रपटाची ऑफर घेऊन यायचा. ते दिवसच वेगळे होते, वातावरण वेगळे होते, रमेश देव यांनी त्या काळातील एक वास्तव सांगितले. चित्रपटसृष्टीचा फ्लॅशबॅक असाही असू शकतो हे मला जाणवले.
शालेय वयातच मला एक विशेष बातमी वाचायला मिळाली, हेमा मालिनीची तारखांची डायरी ( कोणत्या रंगाची?) तिची आई अम्मा अर्थात जया चक्रवर्ती पाहतात. निर्मात्यांना हेमा मालिनीच्या तारखा हव्या असतील तर जया चक्रवर्तींना भेटावे लागे. सहज गंमत म्हणून मनात प्रश्न येत असे, अगोदर धर्मेंद्रच्या तारखा (Date Schedule) नक्की करुन निर्माते हेमा मालिनीच्या आईची भेट घ्यायला येत असतील का? या दोघांच्या वाढत्या सहवासात तारीख हा घटक खूपच ‘महत्वाचा’ राहिला असेल. चित्रपट अशा अगणित छोट्या छोट्या गोष्टींतून घडत वा बिघडत असतो.

सेक्रेटरीकडे ‘स्टारची डेटसची तारीख’ (Date Schedule) असते हा फिल्म जगतातील परवलीचा आणि विश्वासाची शब्द. मिडियात असतानाच याबाबतचे कुतूहल शमवण्यासाठी अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि शिल्पा शिरोडकर यांचा एकाच वेळेस सेक्रेटरी असलेल्या रिक्कू राकेशनाथला याबाबत एकदा विचारले. (त्या दिवसात एकाद्या स्टुडिओत आम्ही सिनेपत्रकार गेल्यावर रिक्कू राकेशनाथ दिसला की आम्ही समजायचो, नक्कीच अनिल कपूर व माधुरी शूटिंग करत असणार) रिक्कू इतकेच म्हणाला, आपल्याकडील दोन वा तीन कलाकारांचा एकच चित्रपट असल्याने डेटस सांभाळणे थोडे सोपे जाते. अन्य कोणासोबत अनिल वा माधुरी असेल तर बर्याच तारखा खाली वर अथवा मागेपुढे होतात. रिक्कूच्या बोलण्यात तथ्य होते. अनिल कपूर एका चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याने बरेच दिवस घरीच असल्याने नेमक्या त्याच वेळेस एन. चंद्रा दिग्दर्शित ‘हमला ‘च्या शूटिंगच्या तारखा (Date Schedule) वाया जात होत्या. तो बरा होऊन परतल्यावर पुन्हा त्याच्या तारखा मिळवताना धर्मेंद्र, मीनाक्षी शेषाद्री व किमी काटकर अशा सगळ्यांच्याच तारखा पुन्हा मिळवणे व जुळवणे इतके आणि असे अवघड झाले की ‘हमला ‘चे पूर्ण होणे रखडत गेले आणि निर्माते मदन मोहला त्रस्त झाले.
‘तारीख पे तारीख’ (Date Schedule) हा कायमच गुंतागुंतीचा प्रकार. यावर अनेक प्रकारे उपाय काढण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक प्रयत्न एकामागोमाग चार चित्रपटांच्या युरोपमधील शूटिंग सत्राच्या आयोजनाने झाला. यश चोप्रा दिग्दर्शित ‘लम्हे’, सतिश कौशिक दिग्दर्शित ‘रुप की रानी चोरों का राजा’, हरमेश मल्होत्रा दिग्दर्शित ‘हीर रांझा’ आणि विनोद मेहरा दिग्दर्शित ‘गुरुदेव’ या चित्रपटात एक गोष्ट काॅमन आहे. अनिल कपूर व श्रीदेवी ही जोडी आहे. एकमेकांना मॅच झालेली म्हणून कन्फर्ट झोनमध्ये राहत काम करणारी सुपर हिट जोडी. तरीही काही चित्रपट फ्लाॅप झाले ते जाऊ देत. पण या चित्रपटातील काही गाणी युरोपमधील विविध लोकेशन्सवर करायचे शेड्युल आखण्यात आले. तशा तारखांचे भारी नियोजन झाले. एका चित्रपटाचे गाणे चित्रीत होताच आणखीन एक चित्रपट. अशाने सर्वांनाच फायदा होईल अशी अपेक्षा. पण चित्रपटातच एक डायलॉग असतो, आदमी सोचता कुछ और है और होता कुछ और है… नेमका निसर्गाने लहरीपणा दाखवला आणि लोच्या झाला. शेड्युल बिघडत गेली. तारखा वाया जाऊ लागल्या आणि याचा जास्त फटका विनोद मेहराला बसला. कसल्याही शूटिंगशिवाय युनिट रिकामे बसणे किती दिवस परवडणार? विनोद मेहरावर याचा फारच तणाव आला आणि मुंबईत आल्यावर त्याचे ह्रदयविकाराने निधन झाले. अरेरे. कितीही तारखा (Date Schedule) मिळवल्या तरीही परिस्थिती नेमके कोणते आव्हान समोर आणेल हे सांगता येत नाही.
‘तारीख पे तारीख’ (Date Schedule) हा खेळ मेळ असा बहुस्तरीय आहे. कधी रंजकही आहे. एकादा पिक्चर नाकारायचे एक कारण, डायरी फुल्ल आहे हे असते तसेच चांगली बिदागी मिळत असेल तर चमत्कार घडावा अशा तारखा उपलब्धही होतात. एकादा चलाख सेक्रेटरी पैशाच्या मोहाने तारखांत हेरा फेरी करुन एकाद्या स्टारचे नुकसान करतो याची फिल्मी कथा अधूनमधून फिरत असतात. कधी एकादा स्टारच तारखांच्या घोळाचे खापर सेक्रेटरीवर टाकण्याचे नाटक वठवतो. हातोहाती मोबाईल येण्यापूर्वीचे हे सगळे दिवस. आता मुंबईवरुन पुण्याला जात असतानाच संध्याकाळचे दोन तास ॲडजेस्ट होत असतील तर मोबाईलवर बोलणेही होते आणि येणेही होते. पुन्हा रात्री उशिरापर्यंत प्रवास करुन सकाळी पुण्यात सेटवर हजर…
=====
हे देखील वाचा : ‘स्टुडिओतील चाळींशी’आजचा प्रेक्षक रिलेट होईल का?
=====
कलाकाराची एकेक तारीख (Date Schedule) ते सेलिब्रिटीजची एकाच तारखेतील अनेक कामे असा हा बदलता प्रवास आहे आणि संपर्क सुविधेचा हा सुपरिणाम आहे. पूर्वी पोस्टाने पत्र तीन दिवसांनी पोहचायचे आता तीन सेकंदात फोनची रिंग वाजते. पूर्वी पत्र मिळाल्याची खुशाली कळवली जाई, आता नको असलेल्या नंबरला अटेंड न करण्याची सवय आपोआप लागलीय. पूर्वी प्रथेनुसार चालायचे आता गरजेनुसार चालतेय. गोविंदा एकाच वेळेस अनेक चित्रपटातून भूमिका साकारत असतानाच त्याच्या कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी सेटवर पाऊल टाकताच त्याची ‘एक तरी तारीख मिळू देत’ यासाठी अनेक निर्माते आल्याचे हमखास दृश्य दिसे. अशा गोष्टीची त्याला, त्या निर्मात्यांना आणि आम्हा मिडियाला सवयच लागली होती.