‘चंबळच्या खोऱ्यातील डाकू’ बॉलीवूडच्या दिग्दर्शकावर भडकले….
साठच्या दशकामध्ये ‘नीलकमल’, ‘काजल’ असे दर्जेदार , अप्रतिम चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राम महेश्वरी यांनी सत्तरच्या दशकामध्ये एक डाकूपट बनवला होता. चित्रपटाचे नाव ते ‘चंबल की कसम’ त्या काळात चंबळ मधल्या डाकूंचा एकूणच बॉलीवूड वर मोठा बोलबाला होता. अनेक डाकू पट त्यावेळेला निर्माण होत होते. काहीतरी वेगळा चित्रपट बनवावा म्हणून राम महेश्वरी यांनी हा डाकू पट बनवताना आपण चंबळला जाऊन एकदा डाकूंना भेटून यावे आणि मग चित्रपट बनवावा असे त्यांनी ठरवले. त्या पद्धतीने राम महेश्वरी, चित्रपटाचे निर्माते तसेच एक मध्यस्थ असे तिघेजण चंबळच्या खोऱ्यात डाकूंना भेटायला गेले. या मध्यस्थाने डाकूंची प्रॉपर अपॉइंटमेंट घेतली होती. जाताना दिग्दर्शक राम महेश्वरी यांच्या मनात धाकधूक होतीच. आपण परत सुकुशल मुंबईत परत येऊ का ही काळजी त्यांना होती. पण मध्यस्थ त्यांना धीर देत होता.
हे तिघे जेव्हा डाकूच्या अड्ड्यावर पोहोचले त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटले कारण त्यांच्या स्वागताची मोठी तयारी इथे डाकूंनी केली होती! त्यांच्यासाठी उत्तम खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. राम महेश्वरी यांनी दरोडेखोरा सोबत चर्चा केली त्यांचे प्रश्न समजावून घेतले. त्यानंतर शाही खाना झाला. संध्याकाळी एका नाच गाण्याच्या मैफिलीचे आयोजन केले गेले. मद्याचे चषक आले. माहोल मोठा रंगीन झाला. देखण्या नृत्य अप्सरा दिल खेचत नृत्य करू लागल्या. माहौल रंगीन असला तरी दिग्दर्शक राम महेश्वरी मनातून घाबरलेले होतेच कारण त्यांना भीती वाटत होती दारू प्यायल्यानंतर डाकूंचे मन बदलते की काय? पण तसे काही झाले नाही. रात्री उशिरा नाच गाणे संपले.
दिग्दर्शक राम महेश्वरी यांनी नाचणाऱ्या मुलीकरिता काही पैसे जमिनीवर ठेवले. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण ज्यावेळी तिला पैसे जमिनीवर ठेवलेले दिसले त्यावेळेला त्या डांसर ने ही बातमी डाकूच्या सरदाराला सांगितले. तो प्रचंड कृद्ध झाला. तो त्याची बंदूक शोधू लागला. इकडे दिग्दर्शक राम महेश्वरी यांची पाचावर धारण बसली. मध्यस्थाला विचारले ,”काय गडबड झाली?” त्याने सांगितले,” तुम्ही पैसे जमिनीवर का ठेवले? हा त्या नाचणाऱ्या कलाकाराचा अपमान आहे. ते काय भिकारी आहेत का जमिनीवरचे पैसे उचलून घ्यायला?” त्यावर महेश्वरी म्हणाले,” मला इथले नियम कुठे काय माहिती आहेत? मला वाटलं तिच्या हातात देणं हे कबिल्याच्या सरदाराला आवडणार नाही. आता यावर उपाय काय?” त्यावर तो मध्यस्थ म्हणाला, ”काही नाही. आता तुम्ही पहिल्यांदा त्या नाचणाऱ्या मुलीची माफी मागा. आणि सन्मानाने तिला तिच्या हातात पैसे द्या!” राम महेश्वरी यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे त्या मुलीची मनापासून माफी मागितली आणि सांगितले की इथले कायदे कानून मला अजिबात माहिती नाही. आणि मोठ्या सन्मानाने तिच्या हातामध्ये ती रक्कम ठेवली. ते पाहून सरदार देखील खुश झाला. त्याने मद्याचा आणखी एक राउंड करूयात असे सांगितले. पण आता राम महेश्वरी म्हणाले,” आभारी आहे पण नको आता. आम्ही परत जातो.” डाकूच्या सरदाराने त्यांना खास संरक्षणाच्या ताफ्यातून जंगलाच्या बाहेर नेऊन सोडले. मुंबईत आल्यानंतर राम महेश्वरी यांनी सुटकेचा निश्वास टाकला! त्यांनी शपथ घेतली की मी यानंतर ‘चंबल की कसम’ सारखे अनेक सिनेमे बनवेन पण ‘चंबळ’ला यापुढे कधी जाणार नाही!
=========
हे देखील वाचा :लढवय्या कलावंत शैलेश दुपारेचा संघर्ष सातासमुद्रा‘पल्याड’
=========
हा सिनेमा बनायला खूप वर्ष लागली. शत्रुघ्न सिन्हा, मौसमी चटर्जी, आणि राजकुमार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमातील गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती. त्यांचा हा अखेरच्या चित्रपटापैकी एक होता. सिनेमा संगीत खय्याम यांचे होते. ’सिमटी हुई ये घडिया’ हे लता-रफी चे अप्रतिम युगलगीत या सिनेमात होते. सिनेमाला फारसे यश लाभले नाही. दिग्दर्शक राम महेश्वरी यांनी साठच्या दशकात ‘नानक नाम जहाज है’ या चित्रपटाची निर्मिती केली होती ज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
धनंजय कुलकर्णी